Monday, 7 March 2016

तो फक्तं खरा असतो..

कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..
समाज त्याला पागल म्हणतो..
पण बुद्धीने तो बरा असतो..
काहीं साठी तो दगड..
तर काहीं साठी हिरा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

सरळ मार्गावर चालणारा तो..
गैर वागणे टाळत असतो.. 
अनेक डाग तो पुसत असतो..
कित्येक वार तो सोसत असतो..
स्वतः जळून धधकत्या अग्नीत..
प्रकाश देणारा तो तारा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

डाग लावणारे ही त्याचेच असतात..
वार करणारे ही त्याचेच असतात..
अश्या बऱ्याच स्वकीय शत्रूंशी..
तो एकटाच झुंजणारा असतो..
कौरवांच्या चक्रव्यूहात अडकलेला..
अभिमन्यू तो बिचारा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

मान त्याला मिळो ना मिळो..
पण अपमान त्याचा टळत नसतो.. 
मान-अपमानाच्या कैचीत अडकून..
मरता मरता तो जगत असतो..
अन्यायाच्या कडक उन्हाळ्यात..
न्यायाचा तो शीतल वारा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

पाउलोपावलि संघर्ष करणारा तो..
कुणी Super hero नसतो..
साधा सरळ Common man तो..
लोकांच्या नजरेत Zero असतो..
पण कर्तव्यनिष्ठ तोच Common man.. 
प्रत्येक संकटात साथ देणारा असतो..
कधीकधी माणूस वाईट नसतो..
तो फक्तं खरा असतो..

-भूषण जोशी

Friday, 25 December 2015

"चित्रपट - बाजीराव मस्तानी"

"चित्रपट - बाजीराव मस्तानी"

भंसाळी साहेबांना मुजरा घालावासा वाटतोय.. सुरेख.. अप्रतिम.. उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी बाजीराव पेशवा आणि मस्तानी ह्यांची प्रेम कहाणी लोकां समोर मांडली आहे. अमिताभ जी ह्यांनी नुक्तेच रणवीर ला ह्या सिनेमा बद्दल कौतुकाची थाप दिली होती आणि म्हणाले होते-  "अरे यार बाजीराव मस्तानी का नशा उतर हि नहीं रहा"

मी खरे तर खूप उशिरा बघितला हा चित्रपट. खरोखर पेशव्यांना बघून मान गर्वाने उंचावते. अद्भुत शौर्य.. असिमित वीरता.. तीक्ष्ण बुद्धी आणि वाक्चातुर्य.. कुणी ही अगदी सहज प्रेमात पडेल असे व्यक्तिमत्त्व. रणवीर सिंघ पेक्षा चांगला अभिनेता ह्या भुमिके साठी मला सुचत नाही. मोहून टाकणारा अभिनय. सुरेख रित्या त्याने मराठी चाल पकडली आहे. सिनेमा बघताना एका क्षणा साठी सुद्धा असे वाटत नाही कि रणवीर हा पंजाबी कलाकार आहे म्हणून. ह्यालाच म्हणतात अभिनय कौशल्य. रणवीर चा मी नव्याने fan झालोय.

शिवाय दीपिका आणि प्रियंका ह्यांचे सौंदर्य आणि अभिनय दोन्ही उत्कृष्टच. प्रियंका ने सुद्धा मराठी बाणा उत्तम पकडला आहे. सगळ्याच कलाकारांचे काम खूप सुंदर आहेे. चित्पावन ब्राम्हणी संस्कृती अतिशय सुरेख दर्शविली आहे. शनिवार वाड्या ची भव्यता बहरुन देणारी दाखवली आहे. आजच्या शनिवार वाड्यात असे काहीच बघण्यास मिळत नाही. भंसाळी ह्यांचं काम अप्रतिमच आहे..असते.

चित्रपटात आक्षेपार्ह अश्या फार क्वचित गोष्टी दिसल्या. पण तार्कीक बुद्धि वापरता त्या सुद्धा योग्यच वाटतात. अर्थातच हे सर्वस्वी माझे मत आहे. मी काही इतिहासकार नव्हे तरी मला असे वाटते कि आजवर बाजीराव आणि मस्तानी ह्यांच्या संबंधांना चुकीच्या पद्धतीने समाजा समोर मांडण्यात आले जेणेकरुन समाजा मधे वेगळाच संदेश जावा. विशेषतः राजकुमारी मस्तानी बद्दल बरेच गैरसमज पसरविले गेले. बाजीराव चुकले होते हे मी सुद्धा मान्य करतो. त्यांनी वेळीच पत्नीव्रता पति सारखे मस्तानीला स्पष्टपणे लांब रहाण्याचे सांगितले असते तर बहुदा जे घडले ते घडले नसते. पण प्रेम आंधळे असते असे म्हणतात. शिवाय श्री कृष्ण, राधिका आणि रुक्मिणी ह्यांच्या कथेची बहुदा ती पुनरावृत्तीच होती जी विधीलिखित असावी. असो.. चित्रपटा मुळे मात्र माझ्या मनात असलेले भ्रम दूर झाले. अतिशय उत्तम पद्धतीने ही कथा लोकां समोर मांडली गेली आहे.

दोन्ही हातात शस्त्र घेउन जेव्हा बाजीराव शत्रूच्या सेनेवर तुटून पडतात तेव्हा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी एकट्याने खिंड लढवणारे वीर बाजीप्रभू देशपांडे आठवतात..

२०,००० सैन्यबळ असलेल्या निझामाला जेव्हा बाजीराव आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने लढाई न करता नमवतात तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आठवतात..

भंसाळी साहेबांनी जरी ह्या चित्रपटा द्वारे प्रेम कहाणी दाखविण्याचे प्रयत्न केले आहेत तरी त्यांनी पेशव्यांच्या शौर्याबद्दल कुठेच तडजोड केलेली दिसत नाही. पेशवे जेवढे सुरेख प्रियकर आणि पति म्हणून दिसतात तेवढेच शूर योद्धा सुद्धा दिसतात. 

चित्रपटातील संगीत तर अप्रतिमच. "अलबेला सजन आयो रे", "मल्हारी", "पिंगा", "दीवानी मस्तानी" गाणी तर जणू नाचायला भाग पाडतात. चित्रपटात कुठे ही कंटाळ येत नाही. उत्सुकता कायम राहाते.  सर्वांनी हा चित्रपट एकदा तरी बघावा.

-भूषण जोशी

Tuesday, 15 December 2015

सुप्रभात..

सुप्रभात सुमन सुगंध हा..
सुख देवुनि जातो मला..
सुख गंध जणू सुविचार तो.. 
संचारतो अवघ्या मना..

सुरुवात सुखि दिवसाची हो..
सुंदर सुरेख सुखात हो..
अति शोभनीय अति दर्शनीय..
अति वंदनीय सुप्रभात हो..

अति शुभ्र जणू हैमाद्र ती..
किती दिव्य जणू दिव्याद्र ती..
असे तेजपुंज नभात ती..
येवो सदा सुप्रभात ती..

सुमधुर सुमंगल प्रेरणा..
आशेची नव जणू चेतना..
ऐसी सुरेख पहाट हो..
देवांस हेची प्रार्थना..

-भूषण जोशी

Friday, 11 December 2015

एक विचार.. अभ्यासक्रमात सावरकर का नाहीत?


माझे शिक्षण केंद्रिय माध्यमातून झाले आहे.. मला आठवते कि "वीर सावरकर" नावाने आम्हाला हिंदी विषयात एकच धडा होता.. त्याहून अधिक सावरकरां बद्दल कधीच कळाले नाही.. खूप अलीकडच्या काळात त्यांच्या बद्दल वाचण्यात आले तेव्हा जाणवले कि देश केवढ्या मोठ्या विभूति ला मुकला आहे.. खरोखर तेज पुंज होते वि. दा. सावरकर. अश्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या देशभक्ता बद्दल शैक्षणिक अभ्यासक्रमात फक्तं एकच धडा? दुर्दैवच म्हणावे हे आजच्या पिढीचे. माझे असे ठाम मत आहे कि स्वा. वीर सावरकरां बद्दल केंद्रिय आणि राज्यस्तरीय अभ्यासक्रमात निश्चितच धडा नव्हे तर धडे असावेत. आज जरी इंग्रज नसले तरी त्यांच्या पेक्षा हि कैक मोठ्या शत्रूंना आजच्या पिढी ला सामोरे जावे लागत आहे.. तेव्हा सावरकरांचे विचार शिवाजी महाराजां प्रमाणेच सगळ्यां साठी अतिशय उत्स्फूर्तकारी व प्रेरणादायक ठरतिल. त्यांच्या देशभक्ति ने ओतप्रोत असलेल्या कविता वाचून प्रत्येक देशवासीया मध्ये देशा साठी आदर प्रेम नक्कीच जागृत होइल ह्याची मला खात्री वाटते. सावरकरां बद्दल अवघ्या देशाला माहिती असायला हवी. सावरकर हे मराठी असले तरी अवघ्या देशा साठी लढत होते. तेव्हा जगाला त्या तेज पुंजा बद्दल सारे काही कळायला हवे. असे महान पुरुष युगात एकदाच जन्माला येतात. त्यांचे विचार हे प्रत्येका पर्यंत पोहोचलेच पाहिजे.

आपला,
भूषण जोशी

Monday, 7 December 2015

कवितांचा शेतकरी..

दिवस कित्येक उलटून गेले..
रथ लेखनाचे थांबून गेले..
इच्छा होवेना काय लिहावे...
विषय अवघे जणू हरपून गेले..

उकरून धरणी माझिया मनाची..
शेत वैचारिक अवघे नांगरले..
बीज नवीन कल्पनाशक्तीचे..
अंतरी तया मी सदा पेरले..

पिकावानि रचना माझ्या त्या..
फुलुनि अवघ्या सुरेख लहरति..
प्रफुल्लित होवून शब्दसुमनाने..
चित्तहरण जणू त्या करति..

असो मी शेतकरी वेगळा..
शेती मी कवितांची करितो..
फळे फुले नवरचनांकुरित..
साहित्याचे बाग सजवितो..

- भूषण जोशी

Tuesday, 17 November 2015

शत्रू मी निज प्राणांचा..

सुचे न काही दिसे न काही..
अंधकारमय जीवन झाले..
बोलू कुणाशी सांगु कुणाला..
व्यथेत मन मुक-बधीर झाले..

चाळणी जणू हृदयाची झाली..
हल्ला झेलुनि शब्दबाणांचा..
जन्मलोच का स्वतः विचारी..
शत्रूच जणू मी निज प्राणांचा..

-भूषण जोशी

Tuesday, 27 October 2015

प्रियमित्र एकांत..

प्रिय एकांता,
                 तू माझा सगळ्यात जुना आणि सगळ्यात पहिला जिवलग मित्र. कधी भेटला ते नेमके आठवत नाही, म्हण्जे मी खूप लहान होतो, बालपण जगत होतो, तेव्हाच कधी तरी भेटला असावा, पण भेटल्या पासून माझ्या सोबत जणू माझ्या सावली सारखा असतोस. अशी सावली जी अंधारात सुद्धा साथ सोडत नाही. तू सोबत असलास कि मला कुणाचीच गरज भासत नाही. तसे तू कुणी सोबत नसल्यावरच भेटतोस पण कधीकधी गर्दीतही तू सोबत असल्या सारखे वाटते.
माझ्या आयुष्यात बरेच नातेवाईक मित्रमंडळी वगैरे आहेत बरंका!! खूप मोठे कुटुंब आहे आमचे. पण का कुणास ठाउक? एवढ्या गर्दीतही एकांता तू मला लाभलास. अतिशय प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि अबोल असा तुझा स्वभाव. तू सोबत असलास कि फक्तं मीच बोलतो, तू निमूटपणे सगळे ऐकून घेतोस. कुठलाच किंतूपरंतु विचारत नाहीस.

खरंतर तुझे बोलणे म्हण्जे मनातल्या मनात. कुठून तरी मनात चेतनेची फुंकर होते आणि जाणवते कि एकांत काही तरी बोलला बरे!! असा तु मितभाषी.

मित्रांनो तुम्हांला सांगतो आम्हा दोघांचे फार जमते बरेे. मी लहानपणापासूनच बोलायला अडखळतो. ज्याला तोत्रे बोलणे असे ही म्हणतात. लहान असताना कळत नव्हते, सगळे हासायाचे, घरात, शाळेत, बाहेर, दुकानात, जेथे हि जात होतो तेथे सगळेच टिंगल करायचे, त्यांच्या बरोबर मी सुद्धा हासायाचो. पण जेव्हा पासून कळायला लागले कि ही टिंगल आपल्यावरच होतेय तेव्हापासून हसुच हरवले हो जणू. सतत टिंगल आणि अपमाना मुळे उदास राहू लागलो. असो, बहुदा तेव्हाच हा एकांत माझ्या आयुष्यात आला असावा. कारण कळायला लागल्यापासून कुणाशीही बोलायला भीतीच वाटायची. समोरची व्यक्ती आपल्या बोलण्यावर हसणार तर नाही ना? असे वाटायचे. मन खूप दुखावले जायचे हो. तसा मी मितभाषी नाही पण मग बोलावे तरी कुणाशी? कोण माझे ऐकून घेइल? कोण माझे बोलणे गंभीरपणे घेइल? कोण टिंगल न करता मला समझुन घेइल? असे बरेच प्रश्न मनात यायचे ज्यांची उत्तरे सदैव नकारात्मकच मिळायची! शाळा काय आणि घर काय जणू माझे अस्तित्व नसल्यासारखेच  सगळे वागायचे. मला नेहमी एकटे राहावे लागायचे.  तेव्हापासूनच ह्या एकांता सोबत मी बोलायला लागलो. छान मन रमायचे. हा माझ्या बोलण्याला हसत नव्हता. मला समझुन घेत होता. आयुष्यात बरीच माणसे त्यांच्या सोयीनुसार आलीत आणि कामे साधून निघून गेलीत पण हा एकांत आजही अगदी एखाद्या खंबीर मित्रा सारखा माझ्या बरोबर आहे.

तो म्हण्तो ना नेहमी मला -
"आरे किती दिवस मला तुझ्या बरोबर ठेवणार आहेस? लवकर कुणी तरी माझ्या सारखी साथ देइल अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येउदेत. खरंतर मलाच कुणाकडे राहणे आवडत नाही पण हल्लीच्या काळात बऱ्याच लोकांना माझी गरज पडू लागली आहे."

मी म्हणालो,
"अरे तुझा साथ आहे म्हणून तरी माझ्या सारखे बरेच कमनशिबी लोकं जगत आहेत!! नाही तर जगणे अवघड होऊन बसले असते. असो.. तू माझा अतिशय जवळचा आणि लहानपणापासूनचा सखा आहेस. तुला येवढ्या सहजासहजी सोडणार नाही मी. माझ्या बद्दल जेवढे तुला ज्ञात आहे तेवढे फक्तं देवाला ज्ञात असेल. तू माझा खरा मित्र. ह्या जगात आल्या पासून तू सोबत आहेस माझ्या. आणि हे मला आता कळून चुकले आहे आता. तुझी जागा बहुदा काही काळा साठी कुणी सांभाळू शकेल पण कायमची भरु शकणार नाही. कारण तू निस्वार्थपणे लोकांच्या आयुष्यात तेव्हा येतोस जेव्हा त्यांचे स्वकीय काय आणि परकीय काय सगळेच त्यांची साथ सोडून देतात. ज्याला तुझ्या सोबत जगणे आले त्याला कधीच कुणाचीच गरज भासत नाही. तो दु:खातही सुख अनुभवु लागतो.
म्हणूनच हे एकांता! तुला मी माझा खरा जीवलग मित्र मानतो. आपले हे नाते त्या परमेश्वराने जोडून दिले आहेत. आपल्या नात्याचे आयुष्य तोच काय ते ठरवेल.

तुझा प्रिय सखा,
भूषण जोशी.