Saturday 5 September 2015

लेख- एक विचार गरिबीचा..

एक विचार गरिबीचा..

गरीब असण्याचे तसे बरेच फायदे आहेत बरं का.. पण एक सर्वात मोठा फायदा म्हणजे असा कि चोर, दरोडेखोर इत्यादींपासून सावध राहण्याची चिंता नसते.. घराचे दार अगदी उघडे ठेवून बिनधास्त बाहेर फिरायला जाता येते.. त्या साठी घर "शनी शिन्ग्नापुरातच" असण्याची सुद्धा आवश्यकता नाही.. एक वेळ चुकून एखादा कमनशिबी अथवा नवखा चोर आलाच तर काही नेण्या ऐवजी तो काही ठेवूनच जायील.. आणि सर्वात जास्त महत्वाचा फायदा म्हणजे "अहंकार" नावाचा अतिशय घातक असा विकार सुद्धा गरीबांपासून दहा हाथ लांबच राहतो.. त्याला फक्त श्रीमंत आणि संपन्न अशी लोक आवडतात.. कारण त्यांच्या कडे गमावण्या साठी बरेच काही असते.. जसे पैसा, संपत्ती, मान, मोठेपणा, माणसे आणि बरेच काही.. अहंकार ह्याच गोष्टींवर तर जगतो.. गरिबा कडे त्याचे मोठे मन आणि दुःखं ह्या व्यतिरिक्त गमावण्या साठी दुसरे काय असते? त्या मुळे अहंकार हा गरिबाला शिवत सुद्धा नाही.. पुन्हा त्याला मान-अपमानाची सुद्धा काळजी नसते.. कारण गरिबाला सगळी कडे एकंच वागणूक दिली जाते आणि ती म्हणजे तिरस्काराची.. त्या मुळे त्याचे मन हे बधीर झाल्या सारखे होऊन जाते.. तसे आजच्या काळात गरीब असण्याचे नुकसानच अधिक आहेत.. पण मी सांगितलेले फायदे सुद्धा कमी महत्वाचे नाही.. तरी कुणी तरी मोठी व्यक्ती बोलून गेलीये कि "गरीब जन्माला येणे हा गुन्हा नव्हे तर गरिबीतच मरून जाणे हा गुन्हा होय". असो.. पण नुकतीच झालेली हि अनुभूती खरंच माझ्या साठी तरी अद्भुत आहे..

आलास काय घेवूनी तू..
गेलास काय देवूनी तू..
साठवले अवघे समुद्र जरी..
जाणार इथेच ठेवुनी तू..

शेवटी काय तर माणूस जन्माला येतो तेव्हा गरीबच असतो आणि मरतो तेव्हा सुद्धा सगळी संपत्ती भूतलावरच सोडून जावे लागते.. पण गरिबीत एक गोष्ट मात्र भरभरून मिळते आणि ती म्हणजे समाधान जी आपल्या सोबतच जाते.. असो.. पण म्हणून मानवाने सदैव गरीबच राहावे असे नाही.. पण श्रीमंतीच्या शिखरावर बसून अहंकाराला आहारी जावू नये एवढी काळजी मात्र अवश्य घ्यावी नाही तर गरिबी केव्हा हि तुम्हाला तिच्या जाळ्यात अडकवू शकते.. कारण जिथे गरिबी आहे तिथे जरी अहंकार जात नसला तरी जिथे अहंकार आहे तिथे गरिबी मात्र आवर्जून जाते...

-भूषण जोशी