Friday 25 December 2015

"चित्रपट - बाजीराव मस्तानी"

"चित्रपट - बाजीराव मस्तानी"

भंसाळी साहेबांना मुजरा घालावासा वाटतोय.. सुरेख.. अप्रतिम.. उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी बाजीराव पेशवा आणि मस्तानी ह्यांची प्रेम कहाणी लोकां समोर मांडली आहे. अमिताभ जी ह्यांनी नुक्तेच रणवीर ला ह्या सिनेमा बद्दल कौतुकाची थाप दिली होती आणि म्हणाले होते-  "अरे यार बाजीराव मस्तानी का नशा उतर हि नहीं रहा"

मी खरे तर खूप उशिरा बघितला हा चित्रपट. खरोखर पेशव्यांना बघून मान गर्वाने उंचावते. अद्भुत शौर्य.. असिमित वीरता.. तीक्ष्ण बुद्धी आणि वाक्चातुर्य.. कुणी ही अगदी सहज प्रेमात पडेल असे व्यक्तिमत्त्व. रणवीर सिंघ पेक्षा चांगला अभिनेता ह्या भुमिके साठी मला सुचत नाही. मोहून टाकणारा अभिनय. सुरेख रित्या त्याने मराठी चाल पकडली आहे. सिनेमा बघताना एका क्षणा साठी सुद्धा असे वाटत नाही कि रणवीर हा पंजाबी कलाकार आहे म्हणून. ह्यालाच म्हणतात अभिनय कौशल्य. रणवीर चा मी नव्याने fan झालोय.

शिवाय दीपिका आणि प्रियंका ह्यांचे सौंदर्य आणि अभिनय दोन्ही उत्कृष्टच. प्रियंका ने सुद्धा मराठी बाणा उत्तम पकडला आहे. सगळ्याच कलाकारांचे काम खूप सुंदर आहेे. चित्पावन ब्राम्हणी संस्कृती अतिशय सुरेख दर्शविली आहे. शनिवार वाड्या ची भव्यता बहरुन देणारी दाखवली आहे. आजच्या शनिवार वाड्यात असे काहीच बघण्यास मिळत नाही. भंसाळी ह्यांचं काम अप्रतिमच आहे..असते.

चित्रपटात आक्षेपार्ह अश्या फार क्वचित गोष्टी दिसल्या. पण तार्कीक बुद्धि वापरता त्या सुद्धा योग्यच वाटतात. अर्थातच हे सर्वस्वी माझे मत आहे. मी काही इतिहासकार नव्हे तरी मला असे वाटते कि आजवर बाजीराव आणि मस्तानी ह्यांच्या संबंधांना चुकीच्या पद्धतीने समाजा समोर मांडण्यात आले जेणेकरुन समाजा मधे वेगळाच संदेश जावा. विशेषतः राजकुमारी मस्तानी बद्दल बरेच गैरसमज पसरविले गेले. बाजीराव चुकले होते हे मी सुद्धा मान्य करतो. त्यांनी वेळीच पत्नीव्रता पति सारखे मस्तानीला स्पष्टपणे लांब रहाण्याचे सांगितले असते तर बहुदा जे घडले ते घडले नसते. पण प्रेम आंधळे असते असे म्हणतात. शिवाय श्री कृष्ण, राधिका आणि रुक्मिणी ह्यांच्या कथेची बहुदा ती पुनरावृत्तीच होती जी विधीलिखित असावी. असो.. चित्रपटा मुळे मात्र माझ्या मनात असलेले भ्रम दूर झाले. अतिशय उत्तम पद्धतीने ही कथा लोकां समोर मांडली गेली आहे.

दोन्ही हातात शस्त्र घेउन जेव्हा बाजीराव शत्रूच्या सेनेवर तुटून पडतात तेव्हा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी एकट्याने खिंड लढवणारे वीर बाजीप्रभू देशपांडे आठवतात..

२०,००० सैन्यबळ असलेल्या निझामाला जेव्हा बाजीराव आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने लढाई न करता नमवतात तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आठवतात..

भंसाळी साहेबांनी जरी ह्या चित्रपटा द्वारे प्रेम कहाणी दाखविण्याचे प्रयत्न केले आहेत तरी त्यांनी पेशव्यांच्या शौर्याबद्दल कुठेच तडजोड केलेली दिसत नाही. पेशवे जेवढे सुरेख प्रियकर आणि पति म्हणून दिसतात तेवढेच शूर योद्धा सुद्धा दिसतात. 

चित्रपटातील संगीत तर अप्रतिमच. "अलबेला सजन आयो रे", "मल्हारी", "पिंगा", "दीवानी मस्तानी" गाणी तर जणू नाचायला भाग पाडतात. चित्रपटात कुठे ही कंटाळ येत नाही. उत्सुकता कायम राहाते.  सर्वांनी हा चित्रपट एकदा तरी बघावा.

-भूषण जोशी

Tuesday 15 December 2015

सुप्रभात..

सुप्रभात सुमन सुगंध हा..
सुख देवुनि जातो मला..
सुख गंध जणू सुविचार तो.. 
संचारतो अवघ्या मना..

सुरुवात सुखि दिवसाची हो..
सुंदर सुरेख सुखात हो..
अति शोभनीय अति दर्शनीय..
अति वंदनीय सुप्रभात हो..

अति शुभ्र जणू हैमाद्र ती..
किती दिव्य जणू दिव्याद्र ती..
असे तेजपुंज नभात ती..
येवो सदा सुप्रभात ती..

सुमधुर सुमंगल प्रेरणा..
आशेची नव जणू चेतना..
ऐसी सुरेख पहाट हो..
देवांस हेची प्रार्थना..

-भूषण जोशी

Friday 11 December 2015

एक विचार.. अभ्यासक्रमात सावरकर का नाहीत?


माझे शिक्षण केंद्रिय माध्यमातून झाले आहे.. मला आठवते कि "वीर सावरकर" नावाने आम्हाला हिंदी विषयात एकच धडा होता.. त्याहून अधिक सावरकरां बद्दल कधीच कळाले नाही.. खूप अलीकडच्या काळात त्यांच्या बद्दल वाचण्यात आले तेव्हा जाणवले कि देश केवढ्या मोठ्या विभूति ला मुकला आहे.. खरोखर तेज पुंज होते वि. दा. सावरकर. अश्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या देशभक्ता बद्दल शैक्षणिक अभ्यासक्रमात फक्तं एकच धडा? दुर्दैवच म्हणावे हे आजच्या पिढीचे. माझे असे ठाम मत आहे कि स्वा. वीर सावरकरां बद्दल केंद्रिय आणि राज्यस्तरीय अभ्यासक्रमात निश्चितच धडा नव्हे तर धडे असावेत. आज जरी इंग्रज नसले तरी त्यांच्या पेक्षा हि कैक मोठ्या शत्रूंना आजच्या पिढी ला सामोरे जावे लागत आहे.. तेव्हा सावरकरांचे विचार शिवाजी महाराजां प्रमाणेच सगळ्यां साठी अतिशय उत्स्फूर्तकारी व प्रेरणादायक ठरतिल. त्यांच्या देशभक्ति ने ओतप्रोत असलेल्या कविता वाचून प्रत्येक देशवासीया मध्ये देशा साठी आदर प्रेम नक्कीच जागृत होइल ह्याची मला खात्री वाटते. सावरकरां बद्दल अवघ्या देशाला माहिती असायला हवी. सावरकर हे मराठी असले तरी अवघ्या देशा साठी लढत होते. तेव्हा जगाला त्या तेज पुंजा बद्दल सारे काही कळायला हवे. असे महान पुरुष युगात एकदाच जन्माला येतात. त्यांचे विचार हे प्रत्येका पर्यंत पोहोचलेच पाहिजे.

आपला,
भूषण जोशी

Monday 7 December 2015

कवितांचा शेतकरी..

दिवस कित्येक उलटून गेले..
रथ लेखनाचे थांबून गेले..
इच्छा होवेना काय लिहावे...
विषय अवघे जणू हरपून गेले..

उकरून धरणी माझिया मनाची..
शेत वैचारिक अवघे नांगरले..
बीज नवीन कल्पनाशक्तीचे..
अंतरी तया मी सदा पेरले..

पिकावानि रचना माझ्या त्या..
फुलुनि अवघ्या सुरेख लहरति..
प्रफुल्लित होवून शब्दसुमनाने..
चित्तहरण जणू त्या करति..

असो मी शेतकरी वेगळा..
शेती मी कवितांची करितो..
फळे फुले नवरचनांकुरित..
साहित्याचे बाग सजवितो..

- भूषण जोशी

Tuesday 17 November 2015

शत्रू मी निज प्राणांचा..

सुचे न काही दिसे न काही..
अंधकारमय जीवन झाले..
बोलू कुणाशी सांगु कुणाला..
व्यथेत मन मुक-बधीर झाले..

चाळणी जणू हृदयाची झाली..
हल्ला झेलुनि शब्दबाणांचा..
जन्मलोच का स्वतः विचारी..
शत्रूच जणू मी निज प्राणांचा..

-भूषण जोशी

Tuesday 27 October 2015

प्रियमित्र एकांत..

प्रिय एकांता,
                 तू माझा सगळ्यात जुना आणि सगळ्यात पहिला जिवलग मित्र. कधी भेटला ते नेमके आठवत नाही, म्हण्जे मी खूप लहान होतो, बालपण जगत होतो, तेव्हाच कधी तरी भेटला असावा, पण भेटल्या पासून माझ्या सोबत जणू माझ्या सावली सारखा असतोस. अशी सावली जी अंधारात सुद्धा साथ सोडत नाही. तू सोबत असलास कि मला कुणाचीच गरज भासत नाही. तसे तू कुणी सोबत नसल्यावरच भेटतोस पण कधीकधी गर्दीतही तू सोबत असल्या सारखे वाटते.
माझ्या आयुष्यात बरेच नातेवाईक मित्रमंडळी वगैरे आहेत बरंका!! खूप मोठे कुटुंब आहे आमचे. पण का कुणास ठाउक? एवढ्या गर्दीतही एकांता तू मला लाभलास. अतिशय प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि अबोल असा तुझा स्वभाव. तू सोबत असलास कि फक्तं मीच बोलतो, तू निमूटपणे सगळे ऐकून घेतोस. कुठलाच किंतूपरंतु विचारत नाहीस.

खरंतर तुझे बोलणे म्हण्जे मनातल्या मनात. कुठून तरी मनात चेतनेची फुंकर होते आणि जाणवते कि एकांत काही तरी बोलला बरे!! असा तु मितभाषी.

मित्रांनो तुम्हांला सांगतो आम्हा दोघांचे फार जमते बरेे. मी लहानपणापासूनच बोलायला अडखळतो. ज्याला तोत्रे बोलणे असे ही म्हणतात. लहान असताना कळत नव्हते, सगळे हासायाचे, घरात, शाळेत, बाहेर, दुकानात, जेथे हि जात होतो तेथे सगळेच टिंगल करायचे, त्यांच्या बरोबर मी सुद्धा हासायाचो. पण जेव्हा पासून कळायला लागले कि ही टिंगल आपल्यावरच होतेय तेव्हापासून हसुच हरवले हो जणू. सतत टिंगल आणि अपमाना मुळे उदास राहू लागलो. असो, बहुदा तेव्हाच हा एकांत माझ्या आयुष्यात आला असावा. कारण कळायला लागल्यापासून कुणाशीही बोलायला भीतीच वाटायची. समोरची व्यक्ती आपल्या बोलण्यावर हसणार तर नाही ना? असे वाटायचे. मन खूप दुखावले जायचे हो. तसा मी मितभाषी नाही पण मग बोलावे तरी कुणाशी? कोण माझे ऐकून घेइल? कोण माझे बोलणे गंभीरपणे घेइल? कोण टिंगल न करता मला समझुन घेइल? असे बरेच प्रश्न मनात यायचे ज्यांची उत्तरे सदैव नकारात्मकच मिळायची! शाळा काय आणि घर काय जणू माझे अस्तित्व नसल्यासारखेच  सगळे वागायचे. मला नेहमी एकटे राहावे लागायचे.  तेव्हापासूनच ह्या एकांता सोबत मी बोलायला लागलो. छान मन रमायचे. हा माझ्या बोलण्याला हसत नव्हता. मला समझुन घेत होता. आयुष्यात बरीच माणसे त्यांच्या सोयीनुसार आलीत आणि कामे साधून निघून गेलीत पण हा एकांत आजही अगदी एखाद्या खंबीर मित्रा सारखा माझ्या बरोबर आहे.

तो म्हण्तो ना नेहमी मला -
"आरे किती दिवस मला तुझ्या बरोबर ठेवणार आहेस? लवकर कुणी तरी माझ्या सारखी साथ देइल अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येउदेत. खरंतर मलाच कुणाकडे राहणे आवडत नाही पण हल्लीच्या काळात बऱ्याच लोकांना माझी गरज पडू लागली आहे."

मी म्हणालो,
"अरे तुझा साथ आहे म्हणून तरी माझ्या सारखे बरेच कमनशिबी लोकं जगत आहेत!! नाही तर जगणे अवघड होऊन बसले असते. असो.. तू माझा अतिशय जवळचा आणि लहानपणापासूनचा सखा आहेस. तुला येवढ्या सहजासहजी सोडणार नाही मी. माझ्या बद्दल जेवढे तुला ज्ञात आहे तेवढे फक्तं देवाला ज्ञात असेल. तू माझा खरा मित्र. ह्या जगात आल्या पासून तू सोबत आहेस माझ्या. आणि हे मला आता कळून चुकले आहे आता. तुझी जागा बहुदा काही काळा साठी कुणी सांभाळू शकेल पण कायमची भरु शकणार नाही. कारण तू निस्वार्थपणे लोकांच्या आयुष्यात तेव्हा येतोस जेव्हा त्यांचे स्वकीय काय आणि परकीय काय सगळेच त्यांची साथ सोडून देतात. ज्याला तुझ्या सोबत जगणे आले त्याला कधीच कुणाचीच गरज भासत नाही. तो दु:खातही सुख अनुभवु लागतो.
म्हणूनच हे एकांता! तुला मी माझा खरा जीवलग मित्र मानतो. आपले हे नाते त्या परमेश्वराने जोडून दिले आहेत. आपल्या नात्याचे आयुष्य तोच काय ते ठरवेल.

तुझा प्रिय सखा,
भूषण जोशी.

Monday 19 October 2015

आई रेणुका..

आई रेणुका स्मरुनि तुला...
जणू स्वर्ग येथेचि लाभला...
बघुनी तुला भजुनि तुला..
हा जन्म सार्थक जाहला..

जगदंब अंब तू अंबिका...
माहूर निवासिनी रेणुका..
तुझिया कृपा अवघ्या जगा..
जगताची तू जगदंबिका...

आई तुझे मी लेकरू..
नवसाने तुझिया जन्मलो..
मजला सदा ग तू तारिले..
मृत्यूशी जेव्हा झुंजलो..

आयुष्य माझे मी जरी..
अवघे तुला अर्पण करी..
उपकार एकही फेडणे...
न शक्य आहे मज तरी..

जागा तुझी ह्या निजमनि..
अविचल असेन ग माउली..
वरदे सदा जीवन उन्हा..
लाभेल तुझिया सावली..

वरदे सदा जीवन उन्हा..
लाभेल तुझिया सावली..

         ___/|\___
रेणुकाभक्त- भूषण जोशी

Sunday 18 October 2015

चिऊताई सावरली असेन..

मित्रानो.. 'मंगेश पाडगावकर' ह्यांची कविता "दार उघड चिउताई" पासून प्रेरणा घेउन काही ओळी सुचल्या.. "चिऊताई सावरली असेन.." आवडल्यास प्रतिक्रिया अवश्य द्या..

नक्कीच चिऊताई घाबरली असेन..
पण कविता वाचून सावरली असेन..

दार तिने उघडलं असेन..
जग तिचं बदललं असेन..

चिमणा एक आला असेन..
तिला येऊन म्हणाला असेन..

चिऊ तू घाबरू नकोस..
एकटी जगात वावरू नकोस..

सोबत माझ्या घे भरारी..
तुला दाखवेन दुनिया प्यारी..

सगळेच इथे कावळे नसतात..
बगळे ही इथे सावळे असतात..

होवु तयांचे सोबती..
जे कधी साथ न सोडती..

आशा नवीन घे मनात..
आनंद बघ सदा जीवनात..

मी तुझ्या सोबत आहे..
इच्छा नवीन ओवत आहे..

साथ तुझी न कधी सोडणार..
मरे पर्यंत तुझ्या सवे जगणार..

चिऊ तू माझा विश्वास कर..
निराशा सोड नवा ध्यास कर..

तुझं दुःख आता मज पाहे ना..
ये बाहेर मी आहे ना...
ये बाहेर मी आहे ना..

-भूषण जोशी

शोधू कुठे...

येते म्हणूनी जी गेलीस तू..
अजून सुद्धा न परतलीस तू..
स्वप्नांची आहेस गोड परी तू..
स्वप्नातच काय हरपलीस तू..

शोधू कसा तुज न ठाऊक मला..
सांभाळू कैसे ह्या नाजुक मना..
भोळा तुझी वाट बघतो अजुन हि..
येशील कधी तू मला सांग ना...

-भूषण जोशी

Saturday 5 September 2015

लेख- एक विचार गरिबीचा..

एक विचार गरिबीचा..

गरीब असण्याचे तसे बरेच फायदे आहेत बरं का.. पण एक सर्वात मोठा फायदा म्हणजे असा कि चोर, दरोडेखोर इत्यादींपासून सावध राहण्याची चिंता नसते.. घराचे दार अगदी उघडे ठेवून बिनधास्त बाहेर फिरायला जाता येते.. त्या साठी घर "शनी शिन्ग्नापुरातच" असण्याची सुद्धा आवश्यकता नाही.. एक वेळ चुकून एखादा कमनशिबी अथवा नवखा चोर आलाच तर काही नेण्या ऐवजी तो काही ठेवूनच जायील.. आणि सर्वात जास्त महत्वाचा फायदा म्हणजे "अहंकार" नावाचा अतिशय घातक असा विकार सुद्धा गरीबांपासून दहा हाथ लांबच राहतो.. त्याला फक्त श्रीमंत आणि संपन्न अशी लोक आवडतात.. कारण त्यांच्या कडे गमावण्या साठी बरेच काही असते.. जसे पैसा, संपत्ती, मान, मोठेपणा, माणसे आणि बरेच काही.. अहंकार ह्याच गोष्टींवर तर जगतो.. गरिबा कडे त्याचे मोठे मन आणि दुःखं ह्या व्यतिरिक्त गमावण्या साठी दुसरे काय असते? त्या मुळे अहंकार हा गरिबाला शिवत सुद्धा नाही.. पुन्हा त्याला मान-अपमानाची सुद्धा काळजी नसते.. कारण गरिबाला सगळी कडे एकंच वागणूक दिली जाते आणि ती म्हणजे तिरस्काराची.. त्या मुळे त्याचे मन हे बधीर झाल्या सारखे होऊन जाते.. तसे आजच्या काळात गरीब असण्याचे नुकसानच अधिक आहेत.. पण मी सांगितलेले फायदे सुद्धा कमी महत्वाचे नाही.. तरी कुणी तरी मोठी व्यक्ती बोलून गेलीये कि "गरीब जन्माला येणे हा गुन्हा नव्हे तर गरिबीतच मरून जाणे हा गुन्हा होय". असो.. पण नुकतीच झालेली हि अनुभूती खरंच माझ्या साठी तरी अद्भुत आहे..

आलास काय घेवूनी तू..
गेलास काय देवूनी तू..
साठवले अवघे समुद्र जरी..
जाणार इथेच ठेवुनी तू..

शेवटी काय तर माणूस जन्माला येतो तेव्हा गरीबच असतो आणि मरतो तेव्हा सुद्धा सगळी संपत्ती भूतलावरच सोडून जावे लागते.. पण गरिबीत एक गोष्ट मात्र भरभरून मिळते आणि ती म्हणजे समाधान जी आपल्या सोबतच जाते.. असो.. पण म्हणून मानवाने सदैव गरीबच राहावे असे नाही.. पण श्रीमंतीच्या शिखरावर बसून अहंकाराला आहारी जावू नये एवढी काळजी मात्र अवश्य घ्यावी नाही तर गरिबी केव्हा हि तुम्हाला तिच्या जाळ्यात अडकवू शकते.. कारण जिथे गरिबी आहे तिथे जरी अहंकार जात नसला तरी जिथे अहंकार आहे तिथे गरिबी मात्र आवर्जून जाते...

-भूषण जोशी
               

Monday 24 August 2015

हवी तूच जगण्याला..

हवी तूच जगण्याला..

स्मित हास्य तुझे पाहूनी..
नीज-भान जणू गं हरपले..
सौन्दर्य देखुनि तुझिया..
हृदयाचे ठोके चुकले..

रेशमी तुझ्या केसांचे..
अलगद चेहेर्यावर पडणे..
भासते जणू डोंगरावरुनी..
वाहत्या पण्याचे झरने..

नयनांचे तुझ्या त्या सुंदर..
केसांच्या माघुन बघणे..
हृदयात सरळ जागा करते..
साधे तुझिया ते दिसणे..

प्रेमात तुझ्या पडलो जर..
जीवन ओतेन तुझ्यावर..
प्रत्येकाची भावना जणू..
ऐसीच असेन तुझ्यावर..

शत भाग्य असेन तयाचे..
तुज प्रेम मिळेल जयाला..
स्वप्न सुंदरी गोड गोजिरी..
हवी तूच जगण्याला..

                                               -भूषण जोशी

सखी अशी एक मजला मिळाली..

सखी अशी एक मजला मिळाली..

सखी अशी एक मजला मिळाली.. 
स्फूर्ती जणू मज जीवनात आली.. 
नाव मधु स्वभाव मधु तिचा.. 
मधुर मैत्रीची सुरुवात झाली.. 

एकटीच ती राहते स्वावलंबी.. 
लढली सदा ती कठीण प्रसंगी.. 
कुणी नव्हे ह्या जगात तिचे तरी.. 
जिंकली सदा ती तिच्याच संगी.. 

ओळखुनी तिला स्तब्ध मी झालो.. 
ऐकुनी तिला मुग्ध मी झालो.. 
सखी जणू मज गुरु सारखी ती.. 
प्रशंसा करुनी निशब्द मी झालो.. 

साधी सरळ तुझिया छवी गं.. 
सखी अशी प्रत्येकास हवी गं.. 
भाग्यवान मी माझी सखी तू.. 
वर्णितो तुज मी खूप छोटा कवी गं.. 

                                                       -भूषण जोशी

Friday 21 August 2015

मन माझे

मन माझे

 

अरे सांग देवा मज काय झाले.. 
अलगद कुणी मज हृदयात आले..
सम्राट मीच माझिया मनाचा..
तरी का मनावर तिचे राज्य झाले.. 



हृदय माझे जणू हे मृदंग झाले..
ठोके हि तालात ऐकण्यास आले..
अचानक जणू का हे मन शांत झाले..
स्वकीयांच्या त्या गर्दीत एकांत झाले..



प्रेमात पडता काय ऐसेच होते..
मनी प्रश्न अमोज निर्माण झाले..
चीडवूनी मित्र हि हेच म्हणाले..
हृदय घेवूनी प्रेम पक्षी उडाले..

                                                              -भूषण जोशी

Thursday 2 July 2015

रोजा करू का उपवास?

रोजा करू का उपवास?

 

हेतू दोघांचे एकच
मग रोजा असो वा उपवास..
मुखी नाम देवाचे
अन मनी त्याचाच ध्यास..

 

धर्म पंथ असो भिन्न
पण रंग रक्ताचा एकचि...
ऐसेच मार्ग वेगळे जरी
ध्येय मात्र तो एकचि..

 

साकार असो देव तो
वा असो निराकार तो..
तारतो पाळतो करतो
प्रेम अपरंपार तो...

 

ध्यावे तया कैसे
प्रश्न हा ज्याचा त्याचा..
देव एकची साजरा
स्वामी तो अवघ्याचा..

                                                 -भूषण जोशी

Monday 22 June 2015

"रेखुनी ऐसे स्वतः पाहतो मी.. "


"रेखुनी ऐसे स्वतः पाहतो मी.. "



रेखुनी मज मी जेव्हा बघितले..
गुणदोष माझे मज तेव्हा उमगले..
पाहूनी मजला मज काही कळेना..
वर्णावे कैसे मज काही सुचेना.. 


वैचारिक मुद्रा माझी ती निराळी..
गांभीर्य डोळ्यात दिसते रसाळी..
वेध भविष्याचा जणू लावितो मी..
रेखुनी ऐसे स्वतः पाहतो मी.. 


साधे सरळ हेचि माझे रहाणे..
थेट लक्ष्यास सदा माझे पहाणे..
डोळे असे जणू लक्ष्य भेदितो मी..
रेखुनी ऐसे स्वतः पाहतो मी.. 


मेषेचा जातक मंगल माझा स्वामी..
उष्ण थोडा पण तितकाच खरा मी..
अकारण कधी न कुणास दुखवितो मी..
रेखुनी ऐसे स्वतः पाहतो मी.. 


मैत्रीत जिव्हाळा अवघ्यास लावतो मी..
ऐसाच मित्र माझ्यात शोधतो मी..
माणसात देव सदा देखितो मी..
रेखुनी ऐसे स्वतः पाहतो मी..
रेखुनी ऐसे स्वतः पाहतो मी..

                                                             -भूषण जोशी

जागतिक पितृदिना निमित्त - "बाबास का विसरतो.."

"बाबास का विसरतो.."

 

आई आई करतो पण बाबास का विसरतो..
आई ती जन्मदायी तिला बाबाच आधार देई..
पहिले-वहिले चालणे ते बाबाच तर शिकवतो..
आई आई करतो पण बाबास का विसरतो.. 

 

खांद्या वर घेवूनी सदा तो बाबाच तर फिरतो..
आपुले पोट भरावे म्हणून मर-मर तोच करतो..
भावना त्याला हि असतात ज्या मनात तो दडप्तो ..
आई आई करतो पण बाबास का विसरतो.. 

 

कधी-कधी ओरडतो पण काळजी तितकीच करतो..
ओरडण्या माघे तयाच्या प्रेम सदा विचरतो..
आई जरी आसरा तरी आधार बाबाच असतो..
आई आई करतो पण बाबास का विसरतो..

                                                                         -भूषण जोशी

Thursday 18 June 2015

"आयुष्य कधीकधी..."

"आयुष्य कधीकधी..."

 

कधीकधी आयुष्य वळण का घेते..
नकळत कुणी का आयुष्यात येते..
स्फूर्ती जणू अंगात भरते..
बिगडलेले जे अलगत सुधरते.. 

 

आलेले कुणी का निघून हि जाते..
डोळ्यात टिपूस का देऊन हि जाते..
आठवणींच्या जाळ्या मध्ये..
मनास कुणी का अडकवून हि जाते.. 

 

ऐसेच हे आयुष्य का असते..
प्रेम जयावर तेच आपले का नसते..
जीव ओतुनी जयावर देतो..
ओंजळ तयांचेच फाटके का असते..

                                                         -भूषण जोशी

Monday 1 June 2015

"कविता"

"कविता"

 

कवितेचे जग अद्भुत असते..
दिसते जे नेहमी तेच नसते..
नसते ते नसून हि दिसते..
काही असून नसते, काही नसून असते..

 

कविता मनाची उंच भरारी..
कविता सागराहून गहरी..
संत भाव अनंत ब्रम्हांडी..
अर्थ ऐसा तिचा विस्तारी.. 

 

कविता जणू भावना रसाळी..
मधुगन्धित शब्दांच्या ओळी..
वैचारिक मन्थनि प्रगटती..
भरिती चैतन्याची झोळी..

                                                     -भूषण जोशी

Thursday 14 May 2015

मातृदिना निमित्त

ओंजळीत तिच्या अनंत सागरे सामावतील..
माया एवढी कि त्यात अनंत ब्रम्हांड बुडतील..
सहस्त्र सुर्यांहून हि तेजस्वी जिचा तेज..
अवघे विश्व जिच्या मुळे विद्यमान आहे..
देवा सारखी किंबहुना देवा पेक्षा हि मोठी जिची ममता..
जन्म देण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार देवा नंतर तिलाच आहे..
बलिदाना पेक्षा हि मोठे बलिदान देण्यास जी सक्षम आहे..
लेकरा साठी मृत्यूशी सुद्धा दोन हाथ करण्या इतकी ती भक्कम आहे..
ममतेच्या साध्या पदरा खाली लेकराचे अवघे आयुष्य घडविणारी ती..
वात्सल्यपूर्ण जिच्या स्पर्शमात्राने मोठ-मोठे दुखणे हरणारी ती..
होय तीच..
जिला कुणी आई म्हणते..
कुणी माता म्हणते..
कुणी Mommy म्हणते तर कुणी अम्मी म्हणते..
कुणी जननी म्हणते तर कुणी जन्मदात्री म्हणते..
नाव वेग-वेगळे पण रूप मात्र एकंच..
ममतेचं.. मायेचं.. वात्सल्याचं..
अश्या पवित्र मातृत्वाला आणि सर्व वात्सल्यमयी मातांना माझे सहृदय शत शत नमन __/\__..
मातृदिना निमित्त माझ्या सर्व मित्रांच्या मातांना खूप खूप शुभेच्छा.. आपण सगळ्या माता जगातल्या सर्वात सुंदर स्त्रिया आहात.. आपण जरी मला जन्म दिला नसला तरी आपणा मुळेच मला इतके छान मित्र-मैत्रिणी लाभले आहेत.. आपल्या विना ह्या जगाची कल्पना कुणीच करू शकत नाही..
आम्हाला जन्म दिल्या बद्दल आणि आमचे पालनपोषण केल्या बद्दल मी आपले आभार नाही मानणार.. कारण आभार मानून मला आपल्या नात्यात परकेपणा नाही आणायचा.. हे एक असे ऋण आहे जे १० जन्मात सुद्धा फेडता येणार नाही.. फक्त एवढंच सांगतो कि आपल्या बद्दल माझ्या मनात असलेला आदर आणि अफाट प्रेम हे सदैव ऐसेच राहील किंबहुना वाढेल पण कमी होणार नाही..

Happy Mother's Day Everyone..

-भूषण जोशी

दडपण ठेवू नकोस..

दडपण ठेवू नकोस.. 

 

रुसुनी कुणावर काय साधते तू..
मनात काय ते सांगून टाकावे..
जीवन अवघे हे दोन क्षणांचे..
वैर धरून का व्यर्थ करावे..

 

अबोल तुझा स्वभाव जरी गं..
दडपण तरी का हृदयी असावे..
बोलुनी कुंठा तुझिया मना तू..
दुख-पाषातून मुक्त करावे..

                                                               -भूषण जोशी

ठेच लागलेला..

ठेच लागलेला..


सुंदर तुझिया नयनांची मज..
नयनांशी गं पेच लागली..
रूप खरे सामोरी येता..
हृदयाला जणू ठेच लागली.. 

 

सुंदर किती जरी जग दिसते..
कळले मज ते भ्रामक असते..
भोळे मन बघुनी सुंदरता...
नकळत सदा जाळ्यात फसते.. 

 

आयुष्यात काही लोकांना भेटल्या नंतर एका कथनाची शाश्वती होते ते म्हणजे "सुंदर दिसणे आणि सुंदर असणे ह्यात खूप फरक असतो" खरे आहे.. अश्याच काही खूप सुंदर दिसणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या लोकांना भेटून हा विचार मनात आला आणि हे कथन पटले.. असो.. देव त्यांना सद्बुद्धि देवो.. आपण मात्र आपल्या परीने प्रामाणिक राहायला हवं.. बोलण्यात आणि वागण्यात कधीही गफलत व्हायला नको..

-भूषण जोशी

 


Monday 27 April 2015

अभिमान माझ्या मी असण्याचा..

अभिमान माझ्या मी असण्याचा..

 

सूर्यास्त पहात मी उभा सागरात..
पसरवूनिया हात जणू मिठीत घेतो..
लाटेवर लाट जरी करते आघात..
सागर अवघा जणू मुठीत घेतो..

 

विश्वास माझा माझ्यावर तो ऐसा..
निराशेची ठिणगी पडताच विजवितो..
अभिमान मजला माझ्या मी असण्याचा..
हृदयात अवघे हे जग सामावितो..

                                                                                -भूषण जोशी

Sunday 19 April 2015

"विचार माझे कुठे हरवले.. "

"विचार माझे कुठे हरवले.. "

 

शब्द का रुसले माझ्यावर..
लेखन माझे कुणी पळवले..
सुचे न काही किती चिंतुनी..
विचार माझे कुठे हरवले..

 

मित्रवत मज विचार माझे..
नकळत माझ्या कुणी लपविले..
निराशेची ठिणगी पडता..
असतील का ते जळूनी गेले.. 

 

शोधूनी मज ते सापडतील का..
महत्व मज त्यांचे जाणवले..
माझेच होते का सोडूनी गेले..
विचार माझे कुठे हरवले..

                                                              -भूषण जोशी

Sunday 5 April 2015

"जन्मदिवस.."

"जन्मदिवस.."

 

जन्मदिवस सुरुवात निज जीवनाची..
जन्मदिवस सुरुवात आईच्या आईपणाची..

 

आनंदाने प्रफुल्लित बापाच्या मनाची..
कुळास वाढविणार्या नवीन वंशांकुराची..

 

सुरुवात आजोबांच्या पुनर्जन्माची....
सुरुवात आजीच्या नवीन वात्सल्याची....

 

दिवस मोठा खरा तो आई साठी..
अविस्मरणीय आनंद तो बापा साठी..

 

साक्षीदार क्षण तो दोघांच्या प्रेमाचा..
कारण तो दोघांना जगण्या साठी..

                                                                         -भूषण जोशी

Monday 23 February 2015

"आईस देव जाणावे… "

"आई सोबत प्रत्येकाचच खूप घट्ट नातं असते.. ह्या प्रेमाला शब्दात मांडता येत नाही.."

 

"आईस देव जाणावे… " 

 

देवास सदा मी शोधू पाही..
सदेह देव मज दिसलाच नाही..

 

मनी चिंतिले चुकले का काही..
उत्तर मिळालं होय! खूप काही..

 

अरे जयास शोधीशी तू ठाई ठाई..
ती तुझीच जन्मदाती आई..

 

देवा आधी आईस पूजावे..
नंतर विट्ठल नाम गावे..

 

आधी चरणस्पर्श तिचे करावे..
मग देवा पुढे शिष नमवावे..

 

पटले मज माझ्या मनाचे..
जणू बोल होते तेची देवाचे..

 

देवदर्शन मज तेथेची जाहले..
जेथे पडती आईची पाऊले..

 

आई मज जगी सर्वोपरी..
तया चरणीच माझी पंढरी..

                                                           -भूषण जोशी

Saturday 21 February 2015

"पांडुरंग हरी.."

"पांडुरंग हरी.."

 

श्याम माझा राम अन हरी..
दर्शन त्याचे चार धामा परी..
स्वर्ग जया चरणी अवतरि..
तोची माझा पांडुरंग हरी..

 

नित्य आशा मनी मी करी..
भेटशील मजला कधीतरि..
मुखी नाम तुझे श्री हरी..
मनी धाम तुझे श्री हरी.. 

 

नांदे जो मज मनी अंतरी..
कृपा सदा जयाची मजवरी..
जया शरणी नमते शिर माझे..
तोची ब्रम्हचैतन्य पांडुरंग हरी..

                                                                           -भूषण जोशी 

                                                                                           (दिनांक -२४/०१/२०१५)

चारोळी संग्रह

चारोळी संग्रह 

पार वैचारिक सागर करतो .. 
चारच ओळी सादर करतो ..
थेंब-थेंब शब्द साठवूनी.. 
कवितेची मज घागर भरतो .. 

भोळ्या मना 
भोळ्या मना रे भोळाच तू..
करतोस का व्यर्थ आशाच तू..
प्रेमळ तुझ्या भावना ह्या जरी रे..
पाषाण हृदयी त्या तमाशाच तू..

रस प्रेम-अमृताचा..
बुडत होतो एकटाच अपमानाच्या सागरी..
वाचवीलेस जणू मला तू नेऊनि खडकावरी..
जगतो कसा-मसा मी पिऊनि घोट कडू शब्दांचा..
आज जणू मज मुखी लाभला रस प्रेम-अमृताचा..

हक्क आहे ग तुला..
राग यावे काय ऐसे..
आपल्यात सांग न..
मैत्री होती कधी पन
संपली का सांग न..
हक्क नाहि का तुझ्यावर..
रागविण्याचा मला..
तू जरी रुसलीस मज वर..
हक्क आहे ग तुला.. 


थंड हिवाळी
सकाळ होती थंड हिवाळी,
अलगद वारा लागत होता,
उन्हात बसलो त्याच सकाळी,
जणू उन्हाळा मागत होता..

मोहभंग
थकलो सहन करुनी मी आता ..
खाऊनी कोडे मोहभंगाचे..
इच्छा मेल्या निरपेक्ष झालो..
पार तुकडे केले हृदयंगाचे..
प्रेम दिले मी अफाट जयाला..
मोडुनि मन माझे तोच गेला..
स्वप्नांच्या मज जळत्या दिव्याला...
जणू संत वाराच विजवून गेला..

"रेव पार्टी.."
मदिरा नाच आणि नशा..
करतात होताच सांज निशा..
नसते भान स्वतःची जेथे..
न कळते कुणास कुठली दिशा..

आरडा-ओरड धिंगाणा मस्ती..
करतात श्रीमंत बिघडलेली कार्टी..
अश्याच पाश्चात्य विकारास येथे..
इंग्रजीत म्हणता "रेव पार्टी.."

 ध्वजावरोहण… 
ध्वजावरोहण सदा पाहता उर भरुनी मज येते..
ध्वजास बघता गर्वाने मग मान ही उंच होते..
विजयी विश्व तिरंगा पाहुनी भारतीयता अनुभवते..
देशा साठी प्राण अर्पीणार्यांची आठव होते..



प्रेम म्हणजे फक्त प्रेम असावं..
 प्रेम म्हणजे फक्त प्रेम असावं..
त्यात वासनेचं खुळ नसावं..
वयाची अट नसावी..वेळेची वट नसावी..
नाती कधी गोड तर कधी आंबट असावी..
ती चावट असली तरी बावळट नसावी..
तिखट असली तरी कडवट नसावी..
प्रेम म्हणजे फक्त प्रेम असावं..
त्याला अर्थ नसलं तरी त्यात स्वार्थ नसावं..


प्रेमळ मन माझे…
प्रेमळ मन माझे तुज साठी कधीच का ओळखत नाही..
आठवणीला तुझ्या कधी मज कारण गं लागत नाही..
गोड जशी तुझी छवी तशी का गोड कधी वागत नाही..
साथ हवी मज तुझी अजून काही तुज मी मागत नाही..


शान.. देशाची..
सुंदर सुरेख.. लाखात एक..
पण झाली ती लेक.. देशाची..
शिकुनी छान.. वाढविला मान..
तिने राखिली शान.. देशाची..


जगणे ऐसेची सार्थ करावे..
जन्मुनी धरेवर काय करावे..
न धन साठवावे न संपत्तीस मोहावे..
न स्वतः दुखावे न कुणास दुखवावे..
संतोष सदा मनात आणावे..
कर्तव्य सदा श्रेष्ठ जाणावे..
प्रेम अर्पावे माणसं जोडावे..
माणूस आहोत माणूसच रहावे..
जगणे ऐसेची सार्थ करावे..


दामन-ए-पाक

के आए थे मैदान-ए-जंग में..
हम भी पाक दामन के साथ..
कि जंग-ए-फ़तह तो मिल गयी..
मगर दामन-ए-पाक ना बचा सके..


"वातावरण जरी पावसाळ तरी आंब्याचा मात्र येणार दुष्काळ.."
(दिनांक-०१/०३/२०१५)
  पाउस आला कसा अवकाळी..
झरा लागल्या जणू पावसाळी..
गारठा मिळाला ऐन उन्हाळी..
पण अंबा पुन्हा गेला दुष्काळी.. 



Feeling भक्तिमय..
भान हरपुनी गेले पडताच राग मज कानी..
झाली पहाट माझी ऐकूनी अभंग वाणी..
विट्ठल नाम गाता वाटे जणू संताची वाणी..
आवाज तो पंडितजींचा अतिगोड मधुर कल्याणी..



"जावे कवितांच्या गावा.."
जावे कवितांच्या गावा..
प्रत्येक शब्द उजळावा..
कविता नव नित रचतांना..
नव-सूर्य जेथुनि उगावा..



का अबोल.. 
मित्र शब्दांचे कवी सखोल..
का राहावे त्यांनी अबोल..
विचार मांडणी जयाची अनमोल..

कधी न जाई तयाचा तोल..  



"फुकटचे तत्वज्ञान नको"
ऊपदेशिने सोपे जरी त्यावर चालणे मात्र कठीण..
ऐसेचि तेही भ्रामक जैसे सोन्याचे हरीण..
आधी नीती-निखार्यांवर स्वतः चालून पाहावे..
नंतर अवघ्या जगाला तत्वज्ञान वदावे..


क्रोध आवरावा..
नियंत्रण नसे जेव्हा क्रोधा वरी..
जीभ भाल्यागत वार करी..
विना स्पर्शिता अंगाला ती..
सरळ हृदयी आघात करी..


"फुकटचे तत्वज्ञान नको"
ऊपदेशिने सोपे जरी त्यावर चालणे मात्र कठीण..
ऐसेचि तेही भ्रामक जैसे सोन्याचे हरीण..
आधी नीती-निखार्यांवर स्वतः चालून पाहावे..
नंतर अवघ्या जगाला तत्वज्ञान वदावे..


पावसाळ धारा.. 

बरसू लागल्या पावसाळ धारा..
ओलाचिंब झाला अवघा पसारा..
न आवड मला तरी हि भिजलो..
गारठा देई अंगास शहारा..

तृष्णा धरेची भागली जराशी..
शेतीस लाभे अमृत सहारा..
मोल पावसाचे न कळे कुणा जर..
शेतकरी अन धरतीस विचारा..

आगमन गणपतीचे..

प्रथमपुज्य पार्वती नंदनाचे..
स्वागत असो त्या सूरपतीचे..
लाभो सुख आनंद चैतन्य..
होता आगमन गणपतीचे..

शृंगार विड्याच्या पानाचा.. 

शृंगार आइ तुज विड्याच्या पानाचा.. 
धन्य झाला तो पान प्रत्येक मानाचा.. 
सुंदर सुरेख दिसते हिरवळ अपार.. 
मनापासून आई तुज करतो नमस्कार.. 
     

शब्द तुझे...

शब्द कधी तुझे फुला सारखे..
कधी टोकदार भाल्या गत..
वार दोघे करीति हृदयावर..
कधी थेट तर कधी कधि अल्गद..

आई तुझा विश्वास 

आई तुझा विश्वास हा..
मजला ग बळ देतो सदा.. 
आशीष तुझिया मजवरी.. 
जिंकेल मी अवघ्या जगा.. 

कधी-कधी

कधी-कधी मज समझत नाही.. 
खेळ कसे तू तिरके करते..
क्षणार्धात आपुले से करूनी.. 
दुसऱ्याच क्षणी परके करते..

डोळ्यात तुझ्या..

पाहु कधी डोळ्यात तुझ्या.. 
अन पाहु तुझ्या हृदयात कधी.. 
कधी दिसे मज छवि तया.. 
अन दिसे तुझे सुख स्वप्न कधी..

लाजता..

लाजता-लाजता तुझ्या मुखावर..
हसू गं येई छान..
गाला वरची खळी पाहता..
विसरून जाई भान..
नज़र लपवीसी तू त्यास लाजुनी
खाली घालुनी मान..
लज्जा खरच आभूषण स्त्रीचं..
झाली मज ही जाण..

कसे सुचे..

कसे सुचे मजला हे सारे.. 
काय सांगु गं मी तुजला.. 
येइ कसे हे माझिया मना.. 
हा प्रश्न सदा पडतो मजला.. 


भूतकाळ मज देगा देवा.. 

निज भूतकाळ मज देगा देवा.. 
त्यास बदलण्या हक्क मिळावा.. 
ज्ञात मजला आज ज्ञान जे.. 
त्या काळात वापरु मज द्यावा..

-भूषण जोशी


माझे अनुभव…

माझे अनुभव… 

|| हर हर महादेव || ॐ नम: शिवाय ||    

(दिनांक -१७/०२/२०१५)

आज महाशिवरात्रीचा पर्व आहे पण पहाटे माझी झोप ही मंदिरातल्या भजनांनी नव्हे तर मस्जीदितल्या आझाण ने मोडली. थोडं आश्चर्यच वाटले पण असो. तेथे सुद्धा देवालाच हाक मारली जाते फक्त भाषा आणि पद्धत वेगळी असते. मुख्य म्हणजे मी वेळेवर जागा झालो. असो. माझ्या घरा जवळच तापी नदीच्या काठी कपीलेश्वर महादेवाचे फार पुरातन मंदीर आहे. आत्ताच दर्शन घेउन आलो. छान वाटते.    

                                                                                                             - भूषण जोशी        

                                                                                                                                        

लहानपणीचा एक किस्सा… 

 (दिनांक -०३/०२/२०१५) 

ha ha..आज लहानपणीचा एक किस्सा आठवला.. मी लहानपणी आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना आधी विचारायचो "तुम्ही परत कधी जाणार?" खूप वेळा ओरडा बसलाय मला माझ्या ह्या वाईट सवई मुळे लहानपणी. काही चपळ पाहुणे हसून विषय बदलून देत.. "बाळ तुझा अभ्यास कसा "चाललाय"? मग काय मी गप्प.. गुपचूप सटकायचो तेथून.  मी सुद्धा पाहुण्यांना असे ह्याच हेतू ने विचारायचो की त्यांनी बरेच दिवस रहावे.. कारण ते थांबले तितके दिवस शाळेला दांडी मारता यायची.. 

-भूषण जोशी