Tuesday 27 October 2015

प्रियमित्र एकांत..

प्रिय एकांता,
                 तू माझा सगळ्यात जुना आणि सगळ्यात पहिला जिवलग मित्र. कधी भेटला ते नेमके आठवत नाही, म्हण्जे मी खूप लहान होतो, बालपण जगत होतो, तेव्हाच कधी तरी भेटला असावा, पण भेटल्या पासून माझ्या सोबत जणू माझ्या सावली सारखा असतोस. अशी सावली जी अंधारात सुद्धा साथ सोडत नाही. तू सोबत असलास कि मला कुणाचीच गरज भासत नाही. तसे तू कुणी सोबत नसल्यावरच भेटतोस पण कधीकधी गर्दीतही तू सोबत असल्या सारखे वाटते.
माझ्या आयुष्यात बरेच नातेवाईक मित्रमंडळी वगैरे आहेत बरंका!! खूप मोठे कुटुंब आहे आमचे. पण का कुणास ठाउक? एवढ्या गर्दीतही एकांता तू मला लाभलास. अतिशय प्रामाणिक, तत्वनिष्ठ आणि अबोल असा तुझा स्वभाव. तू सोबत असलास कि फक्तं मीच बोलतो, तू निमूटपणे सगळे ऐकून घेतोस. कुठलाच किंतूपरंतु विचारत नाहीस.

खरंतर तुझे बोलणे म्हण्जे मनातल्या मनात. कुठून तरी मनात चेतनेची फुंकर होते आणि जाणवते कि एकांत काही तरी बोलला बरे!! असा तु मितभाषी.

मित्रांनो तुम्हांला सांगतो आम्हा दोघांचे फार जमते बरेे. मी लहानपणापासूनच बोलायला अडखळतो. ज्याला तोत्रे बोलणे असे ही म्हणतात. लहान असताना कळत नव्हते, सगळे हासायाचे, घरात, शाळेत, बाहेर, दुकानात, जेथे हि जात होतो तेथे सगळेच टिंगल करायचे, त्यांच्या बरोबर मी सुद्धा हासायाचो. पण जेव्हा पासून कळायला लागले कि ही टिंगल आपल्यावरच होतेय तेव्हापासून हसुच हरवले हो जणू. सतत टिंगल आणि अपमाना मुळे उदास राहू लागलो. असो, बहुदा तेव्हाच हा एकांत माझ्या आयुष्यात आला असावा. कारण कळायला लागल्यापासून कुणाशीही बोलायला भीतीच वाटायची. समोरची व्यक्ती आपल्या बोलण्यावर हसणार तर नाही ना? असे वाटायचे. मन खूप दुखावले जायचे हो. तसा मी मितभाषी नाही पण मग बोलावे तरी कुणाशी? कोण माझे ऐकून घेइल? कोण माझे बोलणे गंभीरपणे घेइल? कोण टिंगल न करता मला समझुन घेइल? असे बरेच प्रश्न मनात यायचे ज्यांची उत्तरे सदैव नकारात्मकच मिळायची! शाळा काय आणि घर काय जणू माझे अस्तित्व नसल्यासारखेच  सगळे वागायचे. मला नेहमी एकटे राहावे लागायचे.  तेव्हापासूनच ह्या एकांता सोबत मी बोलायला लागलो. छान मन रमायचे. हा माझ्या बोलण्याला हसत नव्हता. मला समझुन घेत होता. आयुष्यात बरीच माणसे त्यांच्या सोयीनुसार आलीत आणि कामे साधून निघून गेलीत पण हा एकांत आजही अगदी एखाद्या खंबीर मित्रा सारखा माझ्या बरोबर आहे.

तो म्हण्तो ना नेहमी मला -
"आरे किती दिवस मला तुझ्या बरोबर ठेवणार आहेस? लवकर कुणी तरी माझ्या सारखी साथ देइल अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येउदेत. खरंतर मलाच कुणाकडे राहणे आवडत नाही पण हल्लीच्या काळात बऱ्याच लोकांना माझी गरज पडू लागली आहे."

मी म्हणालो,
"अरे तुझा साथ आहे म्हणून तरी माझ्या सारखे बरेच कमनशिबी लोकं जगत आहेत!! नाही तर जगणे अवघड होऊन बसले असते. असो.. तू माझा अतिशय जवळचा आणि लहानपणापासूनचा सखा आहेस. तुला येवढ्या सहजासहजी सोडणार नाही मी. माझ्या बद्दल जेवढे तुला ज्ञात आहे तेवढे फक्तं देवाला ज्ञात असेल. तू माझा खरा मित्र. ह्या जगात आल्या पासून तू सोबत आहेस माझ्या. आणि हे मला आता कळून चुकले आहे आता. तुझी जागा बहुदा काही काळा साठी कुणी सांभाळू शकेल पण कायमची भरु शकणार नाही. कारण तू निस्वार्थपणे लोकांच्या आयुष्यात तेव्हा येतोस जेव्हा त्यांचे स्वकीय काय आणि परकीय काय सगळेच त्यांची साथ सोडून देतात. ज्याला तुझ्या सोबत जगणे आले त्याला कधीच कुणाचीच गरज भासत नाही. तो दु:खातही सुख अनुभवु लागतो.
म्हणूनच हे एकांता! तुला मी माझा खरा जीवलग मित्र मानतो. आपले हे नाते त्या परमेश्वराने जोडून दिले आहेत. आपल्या नात्याचे आयुष्य तोच काय ते ठरवेल.

तुझा प्रिय सखा,
भूषण जोशी.

No comments:

Post a Comment