मी एक अस्पृश्य ब्राह्मण ?
समस्त ब्रम्हवृंदाला माझा नमस्कार, आपणा समोर एक विषय मांडायचा होता. काही दिवसांपूर्वी मला माझ्या एका जवळच्या "नॉन-ब्राम्हण" मित्राचा फोन आला. हा मित्र मूळचा मध्य प्रदेश चा. शिक्षण घेण्यासाठी म्हणून तो महाराष्ट्रात आला होता. तेव्हाच आमची ओळख झाली. गळ्याने अतिशय मधुर असल्या मुळे आणि मला देखील गायनाची आवड असल्यामुळे आमची मैत्री अजूनच घट्ट झाली. देवाने कलागुण देताना त्याची जात बघितली नव्हती. गायनामध्ये अतिशय तरबेज असलेला माझा हा मित्र एका IT कंपनी मध्ये काम करू लागला. एके दिवशी त्याचा मला फोन आला. फोनवर तो मला विचारू लागला - "भूषण ! तू कोणत्या शाखेचा ब्राम्हण आहेस ?" मी म्हणालो का रे बाबा? तुला हा प्रश्न का पडलाय ?
तो म्हणाला - " आरे मला आत्ताच कळाले आहे कि तुमच्यातही अस्पृश्यता आहे ! तुम्ही सुद्धा शाखा भेद करतात ! "
मी जरा वेळ शांत झालो आणि म्हणालो- "असे काही नाहीये रे. तुला कुणी सांगितलं ?"
त्यावर त्याने मला त्याच्या ऑफिस मधला एक किस्सा सांगितला. कुणीतरी "काटदरे" आडनावाचा त्याचा सहकर्मचारी आहे. एके दिवशी बोलता-बोलता सहज विषय निघाला.
चौधरी बुवा (म्हणजे माझा मित्र) काटदरेंना म्हणाले- "तुम्ही कुठल्या कास्ट चे आहात? तुमचे आडनाव कधी ऐकलेले नाही !"
त्यावर काटदरे बुवा म्हणाले- "आम्ही ब्राम्हण आहोत."
चौधरी बुवा खुश होऊन म्हणाले- "अरे वाह! छानच कि! माझा एक बेस्ट फ्रेंड आहे तो पण ब्राम्हण आहे!"
काटदरे बुवा म्हणाले -"हो का ! काय आडनाव त्याचे?"
चौधरी बुवा म्हणाले -" जोशी !" त्यावर काटदरे बुवा नाक मुरडत म्हणाले - " जोशी होय? यजुर्वेदी ! भिकारचोट असतात ही लोक !"
हे ऐकून माझ्या मित्राला धक्काच बसला! तो म्हणाला - " का हो? असे का म्हणताय तुम्ही? तुम्ही सुद्धा ब्राह्मणच आहात की ? "
यावर काटदरे बुवा मोठ्या तोर्याने म्हणाले - "आम्ही ऋग्वेदी ब्राम्हण ! आम्ही श्रेष्ठ आहोत ! इतर सर्व शाखा आमच्या खाली ! "
माझा मित्र त्यांचे उत्तर ऐकून अवाकच झाला! त्याला कळेच ना काय बोलावे ते! आणि ही सगळी चर्चा एका IT कंपनी मध्ये बसून चाललीये!
असो. माझा खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्याला माझ्या बद्दल वाईट वाटलं. त्याने ताबडतोप मला फोन केला आणि माझी शाखा विचारली. मला म्हणाला भूषण ! मला फक्तं जातीय अस्पृश्यता माहित होती. आमच्या गावात आजही ती पाळली जाते. तुझ्यात मला ती भावना कधीच दिसली नाही. तू माझ्याशी कधीही अस्पृश्यतेने वागला नाहीस. आपण एकमेकांच्या घरी येणेजाणे करायचो. सोबत जेवायला बसायचो. तुझी आई तर इतक्या प्रेमाने जेवायला वाढायची कि मला कधी कळलेच नाही कि मी एका ब्राम्हणाच्या घरी जेवतोय जे माझ्या गावात आजही शक्य नाही. पण आज अचानक असे वाटले कि तू सुद्धा आमच्यातलाच एक आहेस. इतर सवर्णी लोक जे आमच्या सोबत वागतात ते इथे तुमचेच लोक तुमच्या सोबत वागत आहेत ! हे आश्चर्यकारक आहे !
आता यावर मी त्याला काय उत्तर द्यावे हे माझे मलाच कळे ना ! मी म्हणालो- " आरे सगळेच तसे नाहीयेत ! काही निवडक असतात जे सगळ्या ठिकाणी आढळतात. आपण दुर्लक्ष करायचं.
हा होता आमच्यातील संवादाचा अंश. आता मला असा प्रश्न पडलाय कि जे लोक स्वतःला ऋग्वेदी म्हणवतात आणि मोठ्या तोर्याने समाजात मिरवतात त्यांना ऋग्वेदा बद्दल अशी कितीशी माहिती आहे? त्यातील एक तरी ऋचा तोंडपाठ आहे का यांच्या? असो. तो त्यांचा विषय. माझा मुख्य प्रश्न असा कि हा शाखा भेद अजूनही आपल्यात आहे का? किंबवणा का आहे? अजूनही आपण एकमेकांना हीन दृष्टीने बघतो का? किंबवणा का बघतो? मी यजुर्वेदी शाखेचा आहे म्हणून मी कमी ब्राम्हण झालो काय? आणि हे ऋग्वेदी शाखेचे लोक जास्त ब्राम्हण असतात काय? मुळात जिथे आपण हिंदू म्हणून एकत्र यायला हवं तिथे जातीय भेद तर सोडा, शाखेवरून भेद सुरु आहेत ! अश्याने परकीय शक्तिंसमोर कसा टिकाव लागणार आहे आपला? आपल्या अश्या वागण्या मुळे धर्म टिकेल का? का लोक हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारताय?
माझ्याच देशात माझ्याच जातीत मी एक अस्पृश्य ब्राम्हण म्हणून जगायचे आहे का? कृपाकरुन कुणीतरी सुज्ञ व्यक्ती असेन तर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही मनापासुन विनंती आहे !
-भूषण जोशी